जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२३
अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना शिक्षक देखील आता गुन्हेगारीच्या विळख्यात अडकू लागले आहे. अशीच एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आपल्या पत्नीसह पाच वर्षाच्या मुलाची हत्या करीत स्वत:ला देखील संपवल्याची घटना मंगळवारी भरदुपारी घडली आहे. हि घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत अतुल मुंढे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते तर पत्नी तृप्ती मुंढे या देखील बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षका होत्या. मंगळवारी दुपारी अतुल मुंढे यांनी पत्नी तृप्ती यांची चाकूने गळा चिरुन हत्या केली.
त्यानंतर त्यांनी मुलगा ओम याचा देखील उशीने तोंड दाबून खून केला. या संपूर्ण घटनेनंतर अतुल यांनी देखील स्वत: गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची थरारक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे.