जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या मुलावर टवाळखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून मालेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवदर्शन घेऊन परतत असताना हा हल्ला झाला असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, गो तस्करी थांबवण्यासाठी मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक आयशर जप्त केले असून त्यातून गायींची देखील सुटका करण्यात आली असल्याचे समजते. घडलेल्या प्रकरणी पोलिसांनी मालेगाव पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.
पहाटे पावणे चारच्या सुमारास आविष्कार भुसे हे देवदर्शन घेऊन परतत असताना टवाळखोरांनी हा हल्ला केला. आयशर गाडीत जनावर चोरून नेत असल्याचा संशय आल्याने आविष्कार भुसे यांनी त्यांच्या वाहनातून पाठलाग केला होता. त्यानंतर आविष्कार भुसे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला असल्याचे समजते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गोवंश जनावरे आढळून आली होती. पोलिसांनी ही जनावरे जप्त करत दाभाडी येथील गो शाळेत पाठवण्यात आली होती. बकरी ईदच्या पूर्वसंध्येला संबंधित मालक जनावरे बाजार समितीमध्ये सोडून पसार झाले होते. तसेच या दिवशी गोवंश जनावरांची खरेदी विक्री केली जात असल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.