जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२३
राज्यातील लाखो चाहत्यांच्या मनावर आपल्या गुडघ्यापर्यंतच्या चड्डी, लोंबणारी नाडी, त्यावर हाफ हाताचा कुर्ता, केसांचा पैलवान कट, बारीक मिशी असणाऱ्या अभिनेते दादा कोंडके अधिराज्यात गाजविले होते. दादा कोंडके यांनी ‘तांबडी माती’ सिनेमातून करियरची सुरुवात केली. पण ‘सोंगाड्या’ सिनेमानंतर दादा कोंडके यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. दादा कोंडके आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या विनोदी आठवणी आजही चाहत्यांना पोट धरुन हासण्यास भाग पाडतात.
दादा कोंडके यांची ९१ वी जयंती मंगळवार ८ ऑगस्टला झाली. या निमित्ताने झी टॉकीज वाहिनीवर ६ ऑगस्टपासून दर रविवारी दादांचे ज्युबिली स्टार सिनेमे दाखवण्यात आले.
दरम्यान, दादा कोंडके यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे कोण चालवणार, चाहत्यांना पोट धरुन कोण हासवणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. दादा कोंडके यांच्या विनोदाचा वारसा पुढे समर्थपणे पेलला तो इंडस्ट्रीतील सर्वांचे लाडके अभिनेते सराफ यांनी. दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना एक गुरुमंत्र दिला होता.
दादा कोंडके यांनी दिलेला गुरुमंत्री आजही अशोक मामा विसरु शकले नाहीत. ‘दादांचा विनोद कधीच ओढून ताणून नव्हता तर त्यामध्ये एक उत्स्फूर्तता होती. विनोदातील निखळता आणि विनोदी संवादातील उत्स्फूर्तता कशी आणायची हे मी दादांकडे पाहून शिकलो. दादांनी जणू मला हा गुरूमंत्रच दिला होता. दादांच्या विनोदातील सहजता लोकांना इतकी भावली की दादांचा सिनेमा म्हणजे ज्युबिली स्टार हे समीकरणच झालं.’पुढे अशोक सराफ म्हणाले, ‘दादांमध्ये खूप टॅंलंट होतं.
दादा पडद्यावरच नव्हे तर व्यक्तीगत आयुष्यातही हजरजबाबी होते. बोलताना त्यांना सहज विनोद सुचायचे. मला त्यांच्यातील आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी बहुतांश सिनेमे विनोदी ढंगातील करूनही त्यांचा विनोद प्रत्येकवेळी नवीनच वाटला.’ असं देखील अशोक मामा म्हणाले. अशोक सराफ आणि दादा कोंडके यांनी अनेक सिनेमांमध्ये अनेक एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘तुमचं आमचं जमलं’,‘पांडू हवालदार’ आणि ‘राम राम गंगाराम’ या तीन सिनेमांमध्ये अशोक सराफ आणि दादा कोंडके यांनी सोबत काम केलं.