जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२३
धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपास जवळील विठ्ठल मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गावर 27 ऑगस्ट रोजी भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार २९ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी अज्ञात वाहनधारकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, भूषण संभाजी माळी (29, रा.पिंपरखेड, ता.भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील भूषण माळी हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला असून दि. २७ ऑगस्ट रोजी भूषण हा शिरसोली येथे राहणार्या बहिणीकडे भेटण्यासाठी आला होता. रात्रीचे जेवण केल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास भूषण हा दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर पाळधी बायपासजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर भूषण माळी याचा जागीच मृत्यू झाला होता.
ही घटना घडल्यानंतर धरणगाव पोलिसांनी धाव घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात दिला. दरम्यान, सोमवार, 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मयत भूषण माळी यांची बहिण भारती सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भालेराव करीत आहे.