जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२३
जिल्ह्यात नुकतेच शरद पवार येवून गेले आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून जाहीर सभेत राज्य व केंद्र सरकारला खासदार शरद पवार यांनी खडे बोल सुनावल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर अभिनव आंदोलन केले. आकाशवाणी चौकात दुपारी राज्यातील हिटलरशाही, दडपशाही व हुकूमशाही विरोधात टरबूजसह हंडी फोडून निषेध करण्यात आला.
शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. युवकांचे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. उपोषणकर्त्यांवर लाठी चार्ज करून हुकूमशाही करण्यात येत असल्याने या समस्यांकडे दुर्लक्ष करून सरकार हे ‘शासन आपल्या दारी’ सारख्या कार्यक्रमांवर भरघोस खर्च करीत असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. हा खर्च वाचवून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागू शकतात.
हे सरकारच्या ध्यानी आणून देण्याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरतर्फे हंडी फोडून निषेध आंदोलन करण्यात आले. हंडीमध्ये टरबूज ठेवून हंडी फोडण्यात आली. महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी यांचा अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, इब्राहिम तडवी, अशोक सोनवणे व इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते.