जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२३
राज्यातील शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत सत्तासंघर्षातील सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबाबत वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. यामध्ये अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळण्यात आले असून 9 मंत्र्यांसह 31 आमदारांंविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे G-20 परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे कार्यालय आज बंद आहे. पण तरीही एका मेलद्वारे शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे उत्तर दाखल करण्यात आले आहे. मंत्र्यांशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. 9 मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यातले 4 विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे. अजित पवार गटाला देखील आजच उत्तर दाखल करायचे आहे. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, आतापर्यंत एकूण आमदारांपैकी किती आमदार अजित पवार यांच्याकडे आणि किती शरद पवार यांच्याकडे हा आकडा स्पष्ट झालेला नव्हता तो आता अखेर समोर आला आहे.
दोन्ही गटाकडून पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई आता निवडणूक आयोगासमोर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सुनिल तटकरे म्हणाले की, मी पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. शरद पवार गटाने कितीही दावे फेटाळले तरी त्याने कोणताही फरक पडत नाही. कारण आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेताना सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास केला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतलेला निर्णय असेल किंवा निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय असेल, ते पाहता निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे,