
जळगाव मिरर | १ जानेवारी २०२४
देशभरातील अनेक राज्यात अनेक गुन्हेगारी घटना तसेच सायबरच्या गुन्ह्यामुळे अनेकांची मोठी फसवणूक होत असल्याचे चित्र नेहमीच दिसत असते पण आता याच गुन्हेगारी जगतात नवा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये तरुणांची मोठी फसवणूक होत आहे. लॉटरी लागली किंवा चारचाकी, दुचाकी, आयफोन यांसह विविध भेटवस्तूंचे आमिष दाखवून सायबर गुन्हे घडतात; परंतु बिहारमध्ये ऑनलाइन फसवणुकीची एक अजब घटना समोर आली आहे. ‘निपुत्रिक महिलांना गर्भवती करा अन् १३ लाख रुपये कमवा,’ अशी ऑफर देऊन एका टोळीने हजारो युवकांना गंडा घातला. या टोळीच्या ८ सदस्यांना अटक करण्यात आली असली तरी म्होरक्या अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
बिहारच्या नवादा जिल्ह्यातील या सायबर स्कॅमची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसदेखील चक्रावून गेले. या भामट्यांनी ‘ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब एजन्सी’ नावाने ऑनलाइन बनावट कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या नावाने तरुणांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवले जायचे. ‘बेबी बर्थ सर्व्हिस’ अर्थात मूल जन्माला घालण्याची सेवा या गोंडस नावाखाली महिलांना गर्भवती करण्याची ऑफर युवकांना देण्यात येत होती. आपल्या आसपास अनेक महिलांना पतीकडून संततीसुख मिळू शकत नाही. त्यामुळे तुमच्या मदतीची गरज आहे. पुत्रप्राप्तीपासून वंचित राहिलेल्या या महिलांना गर्भधारणेसाठी मदत करा अन् त्याबदल्यात १३ लाख रुपये कमवा. ती महिला गर्भवती झाली नाही तरीदेखील किमान ५ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवण्यात येत होते.
नोकरी, रोजगार नसलेले युवक अशा ऑफरला भुलून या भामट्यांच्या जाळ्यात अलगद अडकायचे. व्हॉट्सअॅप मॅसेजवर रिप्लाय देणाऱ्या व्यक्तीकडून सर्वप्रथम नोंदणी शुल्कापोटी ७९९ रुपये मागितले जायचे. हे पैसे ऑनलाइन ट्रान्सफर झाले की, संबंधिताच्या व्हॉट्सअॅपवर काही महिलांचे फोटो पाठवण्यात यायचे. फोटोद्वारे महिलेची निवड केल्यानंतर सुरक्षा ठेव म्हणून ५ ते २० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेची मागणी केली जायची. महिलेच्या सौंदर्यावर ही रक्कम अवलंबून होती. सुंदर महिलेसोबत शय्यासोबत करायला मिळतेय आणि त्याबदल्यात रुपयेदेखील न देता उलट लाखो रुपयांची कमाई होतेय, असा विचार करून अनेक जण या भामट्यांना पैसे द्यायचे. मात्र एकदा पैसे मिळाले की, हे भामटे संपर्क बंद करायचे.
यानंतर आपण फसल्याचे संबंधितांना कळाले तरी तक्रारीसाठी कोणीही पुढे येत नव्हते. या सायबर फसवणुकीचा बळी ठरलेल्या एका युवकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवली आणि एके ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ९ मोबाईल फोन, २ प्रिंटर आणि इतर काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीचा म्होरक्या मुन्नाकुमार मात्र निसटण्यात यशस्वी ठरला. पोलीस उपअधीक्षक कल्याण आनंद यांनी हा गुन्हा बिहारच्या नवादापुरताच मर्यादित नसून इतर राज्यांमधील लोकांचीही फसवणूक झाली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अटकेतील आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच म्होरक्यासह इतर काही जणांनादेखील अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.