जळगाव मिरर । १० सप्टेंबर २०२३
अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडून शिंदे व फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार एक नव्हे तर दोन वेळा शरद पवार यांच्या भेटी घेतल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी संभ्रमात पडली होती.
पण आज शरद पवारांनी अजित पवारांच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदा आपली भूमिका स्पष्ट जाहीर केली आहे. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार यांनी संबोधित केलं.
शरद पवार म्हणाले कि, ‘जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दरवाजे बंद झालेत’, अजित पवारांसोबत सत्तेत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांबाबत बोलतांना शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय. तर यावेळी शरद पवारांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीमध्ये ज्या काही आपल्या वाटेला 70-80 येतील त्याच्या तयारीला लागण्याचं आवाहन देखील शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
शरद पवार यांनी भाजपवर देखील निशाणा साधला, यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली, की आता देशाच्या पातळीवर अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यांना बाजूला सारुन आपल्याला हवं तसं वातावरण निर्माण करण्यात आलं.
यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या दिशेने त्यांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे.’ पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, ‘महागाईचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न या कोणत्याच प्रश्नाकडे आताचे राज्यकर्ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. हा प्रयत्न आपण करतच राहू.’ तर देशातील जनतेचं लक्ष विचलित करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.