जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२३
राज्यातील अनेक भागात पाऊस नसल्याने अनेक शेतकरी चिंतेत आला असून एक धक्कादायक घडली आहे. शेतातील उभी पिकं करपली, मग आपल्या शेतकरी बापाने घेतलेले कर्ज कसं फेडायचं ? त्यात आपल्यावर बेरोजगारीचे संकट, या विवंचनेतून एका २५ वर्षीय शेतकरी पुत्राने स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील भोपा गावात गुरुवारी ७ सप्टेंबर दुपारसच्या सुमारास ही घटना घडली आहे. किरण पांडुरंग वाघचौरे (वय २५ वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. वडिलांवर असलेलं बँकेचं कर्ज आणि बेरोजगारीपणाला कंटाळून किरणने आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याच्या अचानक निघून जाण्याने वाघचौरे कुटुंबियांसह भोपा गावात गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत किरणचे वडील पांडुरंग वाघचौरे यांच्यावर तेलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज होते. गेल्यावर्षी अवकाळीमुळे पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने पांडुरंग वाघचौरे यांना कर्ज फेडणं कठीण झालं. त्यात यावर्षी पावसाने बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवली. दुबार पेरणी करून सुद्धा पावसाने पाठ फिरवल्याने वाघचौरे कुटुंबिय आर्थिक संकटात सापडले.
अशातच वडिलांवर झालेला कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, आपण बेरोजगार आहोत, याची चिंता किरणला लागली होती. याच चिंतेतून किरणने स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून घेतलं. दरम्यान याप्रकरणी दिंदूड पोलिस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.