जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात पेपर सुरु असतांना या पेपर सोडविण्यासाठी अनेक विध्यार्थी कॉपी करताना आढळून आले तर एकाने तर जे केले ते धक्का देणारे होते. नांदेड येथील बी.सी.ए.प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याने सातही पेपरच्या उत्तरपत्रिकेमध्ये चक्क पाचशे रुपयांच्या नोटा चिकटवून ‘मला पास करा’, असे लिहीत उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांकडे सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड येथील मल्यांकन केंद्रावर सदर बाब परीक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या सातही उत्तरपत्रिका जशाच्या तशा सीलबंद करून विद्यापीठाकडे पाठविण्यात आल्या.
हे गैरवर्तणुकीचे प्रकरण विद्यापीठाच्या समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले होते. समितीने या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित विद्यार्थ्याची सर्व विषयाची संपादणूक रद्द करून त्यास पुढील एकूण चार परीक्षेसाठी बंदी घातली आहे. तसेच तीन हजार ५०० रुपयांची ही रक्कम कुलगुरू फंडामध्ये जमा केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या १,७२० विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने कडक कारवाई केली आहे