जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२४
पारोळा शहरातील एन. ई. एस. बॉईज हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी तेथील कार्यरत असलेल्या शिपायाकडे नोकरी टिकवायची असेल तर १० हजार रुपयाची मागणी केली. या प्रकरणी त्यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याची कारवाई २६ रोजी सायंकाळी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील एन. ई. एस. बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम बालूप्रसाद मिसर (वय ५५, रा. जगमोहनदास नगर, पारोळा) यांच्या बंधूंची गेल्या काही दिवसापूर्वी संस्थेचे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी ते उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, तेथील शिपायांना बोलावून त्यांनी सांगितले की, नोकरी टिकवायची असेल तर १० हजार रुपये आणून द्या, अशी त्यांनी मागणी केली. या मागणीच्या आधारावर येथील शिपायाने धुळे येथे ९ फेब्रुवारीला तक्रार केली होती. त्यानुसार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० फेब्रुवारी व १२ फेब्रुवारीला सापळा रचला. परंतु, लाचेची रक्कम इतर शिक्षकांकडे देण्यात सांगितल्याने ही कारवाई स्थगित करण्यात आली होती. याबाबत १० व १२ फेब्रुवारी रोजी लाचेची रक्कम मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर २६ रोजी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनात केली. दरम्यान, एक आठवडयापूर्वीच पंचायत समितीच्या दोघाना लाच घेतांना पकडले होते. आठ दिवस होत नाहीत, तोपर्यंत हायस्कूलच्या मुख्याध्यापक लाच घेताना जाळ्यात अडकल्याने शहरात खळबळ उडाली आहे.