जळगाव मिरर । १७ सप्टेंबर २०२३
मुक्ताईनगर तालुक्यात एक ३६ वर्षीय तरुण हातात तलवार घेऊन दहशत माजवित असताना मुक्ताईनगर पोलिसांनी त्याला वढवे येथून अटक केली असून त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथील रहिवासी गोकुळ समाधान पाटील हा शनिवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता हातात तलवार घेऊन वढवे गावातील परिसरात दहशत निर्माण करून ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकूर, प्रशांत चौधरी, रवींद्र धनगर यांनी कारवाई करत दुपारी २ वाजता संशयित आरोपी गोकुळ समाधान पाटील याला अटक केली. तसेच त्याच्या त्याच्या गुरांच्या चारांमध्ये लपवून ठेवलेली तलवार हस्तगत करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोकुळ समाधान पाटील यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शेटे करीत आहे.