जळगाव मिरर | १७ जुलै २०२५
मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी गोलाणी मार्के टजवळ आलेल्या वाहनाचे वायर तोडून जनरेटर ठेवलेले वाहन चोरुन नेले. ही घटना दि. १४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ही संपुर्ण घटना तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी मिलींद मुकुंद थत्ते (वय ४३, रा. नवीपेठ) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नवीपेठेत मिलींद थत्ते हे वास्तव्यास असून त्यांचा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे जनरेटरचे वाहन असून त्यांनी ते वाहन त्यांच्या घरासमोर असलेल्या गोलाणी मार्केटसमोर असलेल्या त्यांच्या मायटी ब्रदर्स नावाच्या दुकानासमोर लावलेले होते. दि. १४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीवरुन दोन चोरटे त्याठिकाणी आले. दुचाकीवरील एक चोरटा हा खाली उतरून त्याठिकाणी लावलेल्या (एमएच १९, एस ०६६६) क्रमांकाच्या वाहनाच्या कॅबीनचा दरवाजा उघडून आत शिरला. त्याने वाहनाचे वायरिंग तोडून वाहन चालू केले आणि जनरेटर सोबत ते वाहन असा एकूण ९१ हजार रुपयांचा ऐवज तेथून चोरुन घेवून गेला.
ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर मिलींद थत्ते यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ नंदलाल पाटील हे करीत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, त्यांना चोरीची संपुर्ण घटना कैद झाल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी ते फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
