चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील एका विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालाचे प्रमाणपत्र आणि बोर्ड सर्टीफिकेटवर आईचे नाव दुरूस्ती करण्याच्या मोबदल्यात स्वत:च्या घरी १ हजाराची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या करवाईने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे चाळीसगाव तालुक्यातील रहिवाशी आहे. त्याचा मुलगा श्री. ना.धो. महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव ता. सोयगाव जि.औरंगाबाद येथून २०२१ मध्ये बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे.
दरम्यान मुलाच्या बारावीच्या निकालाचे प्रमाणपत्र आणि बोर्ड सर्टीफिकेटवर आईचे नाव चुकीचे असल्याने नाव दुरूस्ती करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र भास्करराव पाटील रा. मालेगाव नाक्याजवळ, चाळीसगाव यांच्याकडे विनंती केली होती. नाव बदल करून देण्याच्या मोबादल्यात मुख्याध्यापकाने १ हजाराची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांच्या सांगण्यानुसार जळगाव लाचलुचपत विभागाने सापळा रचून मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी स्वत:च्या घरी १ हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
यावेळी लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.