यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील कोळन्हावी येथील शेतात बांधकाम सुरू असतांना अचानक भिंत कोसळल्याने १९ वर्षीय तरूणाला दबुन दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील कोळन्हावी शिवारातील तापी नदीच्या काठी असलेल्या योगेश विठ्ठल साळुंखे यांच्या पुनगाव रस्त्यावरील शेतात बांधकाम यावल येथील गवंडी कामागरांच्या वतीने सुरू आहे. याठिकाणी शेख दानिश शेख रफिक(वय १९) हा देखील कामाला आला होता. बुधवारी १८ मे रोजी बांधकाम सुरू असतांना दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास बांधकाम सुरू असतांना बांधकाम करण्यासाठी मिक्सर ग्राइंडर आणले होते. या मिक्सर ग्राइंडरवर शेख दानिश हा बसलेला होता. अचानक बांधकाम केलेली भिंत मिक्सर ग्राइंडरवर कोसळल्याने शेख दानिश हा मिक्सर ग्राइंडर खाली दाबला गेल्यान जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे यावल शहर व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.