जळगाव : प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून संधीवाताने त्रस्त महिलेची आता आपण चालू शकणार नाही, अशी मानसिकता झाली होती, मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञांनी खुबारोपण शस्त्रक्रिया करुन रुग्णाला दोन्ही पायांवर उभे केले, आता आपण चालायला लागलो, याचा मनस्वी आनंद महिलेला झाल्याने रुग्णालयाचे आभार मानले.
संधीवाताचा विस्तार अधिक झाला आणि ४८ वर्षीय गीताबाईचा (नाव बदललेले) चा उजवा खुबा खराब झाला, परिणामी पलंगावर खिळून राहण्याची परिस्थीती निर्माण झाली, आता मी कधीच चालू फिरु शकणार नाही, अशी मानसिकता झालेल्या रुग्णाला गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातून आशेचा किरण दिसला. येथील अस्थिरोग तज्ञ डॉ.दिपक अग्रवाल यांनी रुग्ण महिलेला सर्वप्रथम एमआरआय व एक्स रे करुन येण्यास सांगितले. रिपोर्टनुसार खुबा खराब झाला असून तो वर सरकल्याचे निदान झाले, यावर संपूर्ण खुबा बदलविण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली, यात इंर्पोटेड टोटल हिप रिप्लेसमेंट विथ बोन ग्राफ्टिंग अर्थात तेथील हाड काढून त्याचा चुरा करुन, त्यावर प्रक्रिया करुन हाडाची बांधणी करण्यात आली.
अस्थिरोग तज्ञ डॉ.दिपक अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया केली असून त्यांना रेसिडेंट डॉ.सुनित वेलणकर, डॉ.परिक्षीत पाटील यांच्यासह भुलतज्ञ डॉ.देवेंद्र चौधरीं यांचे सहकार्य लाभले.
संधीवातामुळे खराब झालेल्या खुब्यावर टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आम्ही केली. ही शस्त्रक्रिया दुर्मिळ आणि तितकीच गुंतागुंतीची होती, रुग्णाची इच्छाशक्ती आणि आमच्या अनुभवाच्या कौशल्याने शस्त्रक्रिया यशस्वी होवून रुग्ण पायावर उभी राहू शकली, त्यामुळे रुग्णही समाधानी झाल्याने आम्ही देखील समाधानी आहोत. असे मत अस्थिरोग तज्ञ डॉ. दिपक अग्रवाल यांनी व्यक्त केले.