मुंबई :वृत्तसंस्था
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांना रमजान काळात कोठडीत राहावं लागणार आहे. नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दाऊद गँगशी संबंधित व्यक्तिकडे जमीन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मलिक यांची कोठडी संपल्याने आज त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. त्यानंतर कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वी कोर्टाने मलिक यांना तुरुंगात खुर्ची, बेड आणि अंथरुण देण्यास परवानगी दिली आहे. या आधी प्रकृती बिघडल्याने मलिक यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.
काय झाले मालिकांवर आरोप ?
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दाऊद टोळीशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे मलिक यांच्या घरावर ईडीने धाड मारली होती. त्यानंतर त्यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्यात आली असता त्यांना 7 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. आता 18 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
राजकीय सूडबुद्धीतून अटक
दरम्यान, मलिक यांच्यावर झालेले आरोप निखालस खोटे असल्याचा दावा मलिक यांच्या कुटुंबीयांनी आणि राष्ट्रवादीने केला आहे. राजकीय सूडबुद्धीतूनच मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिला आहे. केंद्रीय तपासयंत्रणेची कारवाई कायद्याला अनुसरूनच आहे असे न्यायालयानं म्हटलं होतं. त्यामुळे मलिक यांच्याकडून कोर्टात वारंवार जामिनासाठी अर्ज केला जात आहे.