मुंबई : वृत्तसंस्था
जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळविला आहे. विधानसभा सदस्यांमधून निवडून जाणार्या जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असल्याचे जाहीर होताच यासाठी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. यातच १० जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा फटका बसल्याने महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला.
काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणीला चार तास उशीर झाला. अखेर चार तासांच्या प्रतिक्षेनंतर ९ वाजता निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले आहेत तर सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनीही विजयी गुलाल उधळला. विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार, हे आधीपासूनच ठरले होते. त्यामुळे दहाव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदारांची फोडाफोडी आणि घोडेबाजाराची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. यात एकनाथराव खडसे यांना २७ मते मिळून ते विजयी झाले. गेल्या सुमारे तीन वर्षांपासून राजकीय विजनवासात असणार्या एकनाथराव खडसे यांना या विजयामुळे दिलासा मिळाला असून त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे.
विधानपरिषदेतील एण्ट्रीनंतर होणार फायदा
एकनाथ खडसे पक्षात आल्यानंतर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्य पसरले होते. खडसेंच्या पाठोपाठ त्यांचे समर्थकही राष्ट्रवादीत दाखल झाले. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचं नाव पाठवण्यात आलं होतं. मात्र राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खडसे विजयानंतर पुन्हा एकदा विधिमंडळात त्यांचा आवाज घुमणार आहे.
एकनाथ खडसेंच्या विजय, आता उट्ट काढणार?
जळगाव जिल्ह्यात भाजप पक्ष वाढीमध्ये एकनाथ खडसेंचा मोठा वाटा राहिला. यासाठी त्यांनी अनेक वर्ष सातत्याने काम केले. भाजपमध्ये असताना खडसेंनी अनेक खात्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. तसंच विरोधी पक्षनेते म्हणून विधानभवनही गाजवले आहे. यामुळे एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणात मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. मात्र २०१४ साली राज्यात भाजपची सत्ता असताना महसूलमंत्री म्हणून काम करणाऱ्या खडसे यांचे पुण्यातील भोसरी येथील कथित भूखंड घोटाळ्यातनाव आले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या पत्नीसोबत संभाषणाचाही आरोप खडसेंवर झाला होता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी राजकीय छळ केल्याचा आरोप खडसे यांनी अनेकदा केला आहे. जळगावमध्ये विविध निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करत या सगळ्याचं उट्ट काढण्याचा प्रयत्न आगामी काळात एकनाथ खडसे यांच्याकडून केला जाऊ शकतो.