पाचोरा : प्रतिनिधी
नुकत्याच संपन्न झालेल्या उन्हाळी अधिवेशनात राज्य सरकारने सर्व पक्षीय आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयाच्या निषेधार्थ दि. १ एप्रिल रोजी पाचोरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भिक मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष फहीम शेख, शहराध्यक्ष ऋशीकेश भोई, तालुका अध्यक्ष शुभम पाटील, रोहित पाटील, प्रशांत पाटील, यश रोकडे, हर्षल चौधरी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकारने घेतलेल्या अत्यंत लोककल्याणकारी निर्णयाला म्हणजेच राज्यातील गोर – गरिब आमदारांना मुंबईत राज्य सरकार घर देणार असुन त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भिक मांगो आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी बाजारपेठेतील दुकानांवर जावुन पैसे गोळा करण्यात आले. जमा झालेले पैसे हे आमदारांच्या घरांसाठी देणगी स्वरुपात निधीत जमा करण्यात यावे अशा आषयाचे निवेदन ही याप्रसंगी तहसिलदार यांना देण्यात आले. सदरील निवेदन व जमा करण्यात आलेला निधी नायब तहसिलदार मोहन सोनार यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.



















