चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव शहरातील हनुमान नगर येथे सप्तशृंगी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने कीर्तनकार सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन सुरू होते. यावेळी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील, दहावाजे नंतर लाउडस्पीकर सुरू ठेवण्यास मनाई असल्याचे सांगत नारदाच्या गादीवर बूट घालून चालून पवित्र गादीचा अवमान केल्याचा आरोप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी केला आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक के के पाटील यांना पाच मे पर्यंत निलंबित करण्यात यावे अन्यथा जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय ठिय्या आंदोलन करेल असा इशारा यावेळी जळकेकर महाराज यांनी दिला.
निरीक्षक के के पाटील यांनी आपल्या पदाला न शोभणारी कृत्य केले असून, वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. मृदंगाचार्य राम महाराज यांच्याशी एकेरी भाषेत बोलून त्यांचा अवमान केला आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो, असे सांगून जळकेकर महाराज यांनी के के पाटील यांना पाच मेपर्यंत निलंबित करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व पोलिस निरीक्षक के के पाटील यांची कार्यालयात भेट घडवून आणत, के के पाटील यांनी केलेल्या चुकीबद्दल जाहीर माफी मागत असल्याचे सांगितले. सोबतच निरीक्षक के के पाटील यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेला साक्षी ठेवून सदर घटना अनावधानाने घडली असून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर याबद्दल जाहीर माफी मागितली.
मात्र आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातील माफीनाम्याचा कार्यक्रम हा भाजप अध्यात्मिक आघाडीचा कार्यक्रम असून तो वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम नाही, असे सांगत के के पाटील यांनी मागितलेली माफी आम्हाला मान्य नसून, त्यांनी ही माफी वारकरी संप्रदाय समोर मागावी अशी मागणी केली आहे.
वारकरी संप्रदाय हा सहनशील व चुका पोटात घेणारा संप्रदाय असून पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या कडून अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल त्यांना मोठ्या मनाने माफ करावे अशी विनंती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.