मुबंई : वृत्तसंस्था
शिवसेनेला सध्याचे आमदार, पदाधिकारी, नेते यांच्या बंडखोरीचा मोठा फटका बसत आहे. त्यात शिवसेनेच्या वजनदार नेत्या खासदार भावना गवळी यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने पक्षात मोठी खळबळ माजली होती. यासंदर्भात एक वेगळी माहिती समोर येत आहे. खासदार भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याबाबत त्यांनी सांगितले की, ‘२०१४ साली मला शिवसेना पक्षाकडून तिकीट हवे होते. परंतु परिस्थिती तशी नाही,’ असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं.
‘ तेव्हा मला पक्षाकडून काही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती,’ असे प्रशांत सुर्वे यांनी सांगितले. आता प्रशांत सुर्वे यांची शिवसेनेत एन्ट्री झाल्याने भावना गवळी यांना आव्हान उभं राहणार असल्याचे चित्र दिसते.
खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे २०१३ मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले. त्यानंतर प्रशांत सुर्वे यांनी भावना गवळी यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती.
प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रशांत सुर्वे मुळचे वाशिमचे असल्यामुळे भावना गवळी यांना मतदारसंघात सुर्वेंच्या रूपाने एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. मध्यंतरी भावना गवळी यांना लोकसभा शिवसेना पक्ष प्रतोद पदावरून हटवण्याची कारवाई उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली होती.
त्यानंतर भावना गवळी शिंदे गटात सामील झाल्या. पुन्हा बंडखोर खासदारांच्या गटाने पत्र देत भावना गवळी यांना प्रतोदपदी नेमले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशांत सुर्वे यांचे शिवसेनेत दाखल होणे, भावना गवळींसाठी अडचणीचे ठरणार आहे.




















