चाळीसगाव : प्रतिनिधी
जमीन मोजणी व जमिनी संदर्भातील अन्य कामांमध्ये भूमि अभिलेखचे अधिकारी व कर्मचारी कुचराई करत असल्याच्या तक्रारी आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याविषयी वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करून सुद्धा कामकाजात सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या आ. मंगेश चव्हाण यांनी आज थेट या चाळीसगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालय गाठून अक्षरश: झाडाझडती घेतली.
त्याठिकाणी आलेल्या चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागातील अर्जदारांनी आपल्या समस्यांचा पाढा आ. मंगेश चव्हाण यांच्यापुढे वाचून दाखवला. येत्या सात दिवसात कामकाजात सुधारणा न झाल्यास याद राखा असा सज्जड दम देखील त्यांनी दिला. या प्रकरणी आपण अँटी करप्शनमध्ये तक्रार करणार असून नागरिकांनी कोणत्याही शासकीय कार्यालयात एक पैसाही देऊ नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
चाळीसगाव शहरात कार्यरत असणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयात एकूण २७ कर्मचारी आहेत. त्यापैकी काही पदे रिक्त आहेत. आ. मंगेश चव्हाण कार्यालयात आल्याचे कळताच कार्यालयात हजर नसलेले कार्यालयाचे उप अधिक्षक भोये तातडीने हजर झाले. त्यांच्याकडे आ. चव्हाण यांनी हालचाल रजिस्टर मागितले असता ते मिळून आले नाही. तसेच हजेरी बुक मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बहुतांश कर्मचाऱ्यांची हजेरी आढळून आली नाही. काही कर्मचाऱ्यांना आ. मंगेश चव्हाण यांनी फोन करून ते कुठे आहेत, याविषयी खात्री केली असता, त्यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये तफावत आढळून आली.
