चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील अपडाऊन करणाऱ्या प्रवाश्यांना जळगाव जाण्यासाठी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कोणतीही गाडी नसल्याने येणाऱ्या अडचणी व चाळीसगाव जंक्शन येथे जलद एक्स्प्रेस गाड्यांना थांबा आणि विविध समस्यांबाबत चाळीसगाव मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालना येथे भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी विविध बाबींकडे लक्ष वेधले.
चाळीसगाव मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा व नाशिक, धुळे, औरंगाबाद या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा मोठा तालुका आहे. चाळीसगाव येथून जळगाव जिल्हा मुख्यालय हे जवळपास १०० किमी अंतरावर असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाश्यांना रेल्वे प्रवास अतिशय सोयीचे माध्यम आहे. मात्र कोविड काळानंतर चाळीसगाव येथील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बरेच बदलले असून त्याचा सर्वाधिक फटका हा नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी कारणांसाठी नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाश्यांना बसला आहे.
याबाबत रेल्वे प्रवाशी संघटना यांनी माझ्याकडे त्यांना येणाऱ्या समस्या मांडल्या असून त्या सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे वैयक्तिक लक्ष द्याल अशी अपेक्षा आमदार चव्हाण यांनी ना.दानवे यांच्याकडे व्यक्त केली. ना.रावसाहेब दानवे यांनीदेखील सर्व मागण्या समजून घेत संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात येऊन लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.