मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सोशल मीडियावर #MeToo या मोहिमेच्या अंतर्गत अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तेव्हापासून तनुश्री तिच्या पोस्ट आणि मुलाखतींच्या माध्यमातून बॉलिवूडमधील पुरुषप्रधान संस्कृतीवर नेहमीच बोट ठेवत असते. आता तनुश्री दत्ताच्या नव्या पोस्टने बॉलिवूडमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत तनुश्री दत्ताने एक कॅप्शन लिहिले की, “मला कधी काही झाले तर #MeToo चे आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील, सहकारी आणि त्यांचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील! बॉलिवूड माफिया कोण आहे? सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणात ज्यांची नावे वारंवार समोर आली तेच लोक, असे ट्विट तनुश्रीने केले आहे.
त्यांचे चित्रपट पाहू नका. त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाका. माझ्या आणि PR बद्दल खोट्या बातम्या पसरवणार्या लोकांचा आणि पत्रकारांचा शोध घ्या. प्रत्येकाच्या मागे लागा. त्यांचे जीवन नर्क बनवा; कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे! कायदा आणि न्यायव्यवस्थेने मला अपयशी ठरवले असेल; पण माझा या महान देशाच्या लोकांवर विश्वास आहे, असे तनुश्री दत्ताने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान २००९ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर नानांनी स्वतःवरील सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले होते आणि २०१९ मध्ये पोलिसांनी त्यांना क्लीन चिटही दिली आहे.




















