नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिवसेंदिवस महागाई वाढत असून पेट्रोल, डिझेल, गॅस, कच्चे तेल, दूध यासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यातच आणखी एक भर पडली असून, पॅरासिटामॉल, अजिथ्रोमायसिन यासह इतर आवश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून १०.७ टक्क्यांनी वाढणार आहेत.
शुक्रवारी भारतीय राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीच्या घाऊक किंमत निर्देशांकात (WPI) १०.७% ची किंमत वाढवल्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना काही आवश्यक औषधांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
“वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागाराच्या कार्यालयाने दिलेल्या घाऊक किंमत निर्देशांक डेटाच्या आधारे, घाऊक किंमत निर्देशांकामध्ये वार्षिक बदल २०२० च्या संबंधित कालावधीच्या तुलनेत २०२१ च्या कॅलेंडर वर्षात १०.७६६०७% इतका आहे,” भारतीय राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने एका नोटीसमध्ये म्हटले आहे. ही नोटीस शुक्रवारी जारी करण्यात आली.
ताप, संक्रमण, त्वचा रोग, उच्च रक्तदाब, अशक्तपणा आणि हृदयविकारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी (NLEM) वरील जवळपास ८०० औषधांचे दर १ एप्रिलपासून १०.७% टक्क्यांनी वाढतील. त्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादीमध्ये (NLEM) पॅरासिटामॉल, अजिथ्रोमाइसिन, फेनोबार्बिटोन, सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराइड, फेनिटोइन सोडियम आणि मेट्रोनिडाझोल सारख्या आवश्यक औषधांचा समावेश आहे.
केंद्राने जीएसटी माफ करावा
औषधांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांवर भार पडणार आहे. केंद्र सरकारने औषधींवरील जीएसटी कमी केला तर औषधी स्वस्त होतील. तसेच जिल्हा केमिस्ट संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तसेच मुख्यमंत्र्यांना देखील जीएसटी माफ होण्यासाठी ट्विट केले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असल्याने औषधींसाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे दर वाढले असून टंचाई निर्माण झाल्याने औषधींचे भाव वाढले आहेत.