माझ्यामागे इडी नाही, माझी पाटी कोरी आहे, भाजपला तोंड देण्यासाठी शिवसैनेत प्रवेश करीत आहे असे म्हणत लेखिका, व्याख्यात्या आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासिका सुषमा अंधारे यांनी सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. पक्षात प्रवेश करताच त्यांची उपनेतेपदी वर्णीही लागली.
अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा- ठाकरे
”आमचा वारसा प्रबोधनकारांचा आहे, बाळासाहेबही सांगायचे की, घंटा बडवणारा हिंदु नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा.” अशी प्रतिक्रीया सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
पुराेगामी नेत्या व काेरेगाव भीमा प्रकरणातील एक तक्रारदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा अंधारे या आज मुंबईत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कित्येक वर्षे हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या अंधारे शिवसेनेत प्रवेश करत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माझ्या कोणत्याही चौकशा सुरू नसून भाजपला ताेंड देणे या एकमेव उद्देशाने मी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले आहे.
सुषमा अंधारेंच्या या प्रवेशावरून त्यांनी याआधी ठाकरे घराण्यावर केलेल्या टीकांचे व्हिडीओ समोर येत आहेत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर त्यांनी 2019 मध्ये एका जाहीर सभेत अत्यंत गंभीर टीका केली होती. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र शिवसेनेला सुषमा अंधारे यांच्या प्रवेशामुळे आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळणार आहे. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणूकांमध्ये याचा शिवसेनेला नक्कीच फायदा होईल.
माझी पाटी कोरी
त्या म्हणाल्या, शिवसेनेतून जे लाेक बाहेर पडतात त्यांच्या डाेक्यावर फाईलींचे ओझे असून ईडी, सीबीआय, आयटी यांच्या टांगत्या तलवारी आहेत. माझ्या काेणत्याही चाैकशी सुरु नसून माझी पाटी काेरी आहे. महाविकास आघाडीत माझ्यावर अन्याय झालेला नाही. परंतु महाराष्ट्राची मान ताठ ठेवण्यासाठी आणि भाजपला ताेंड देण्याकरिता मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. माझे समविचारी लाेक माझ्यासाेबत शिवसेनेत प्रवेश करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.




















