नोएडा :वृत्तसंस्था
कधी कधी गैरसमजातून खूप मोठे नुकसान होत असते तसेच काही नोएडा येथे झाले आहे. या गैरसमजामुळे एका युवकाला आपला जीव गमवावा लागलेला असल्याचे दिसून आले आहे. कथित मूल चोरल्याप्रकरणी एका तरुणाला झाडाला बांधून चोप देत त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नोएडामधील दनकौर परिसरात एका गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. ननकू असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमके घडले?
दनकौर परिसरातील नरेश नामक तरुणाच्या सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री कानारसी गावात ननकूला ग्रामस्थांनी झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ननकूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्य आरोपी नरेशला पोलिसांनी अटक केली असल्याचे दनकौर पोलिस स्टेशनचे प्रभारी सुधीर कुमार सिंह यांनी सांगितले. मयताचा भाऊ पंचांग याने दनकौर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून नरेशसह अनेकांची नावे आहेत.
