निंभोरा: प्रतिनिधी
राज्यभरात दोन्ही बाजूंनी भोंग्यांचे राजकारण सुरू असताना रावेर तालुक्यातील निंभोरा येथे हिंदू बांधवांतर्फे मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान मासानिमित्त रोजाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. येथील मशिदीत पवित्र रमजान महिन्याच्या २९व्या रोजनिमित्त सर्व शक्तीसेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा.संजय मोरे यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,डॉ एस डी चौधरी,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, यांच्यासह श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल ब-हाटे,ग्रा पं सदस्य शेख दिलशाद,नामदेव खंडू ढाके पतसंस्थेचे चेअरमन युनूस खान,करीम मण्यार, मौलाना आदी उपस्थित होते.यावेळी गावातील एकोपा राखण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे सण साजरे करीत असून या वर्षी अक्षय तृतीया व रमजान ईद एकाच दिवशी येत असल्याने मौलाना व श्रीराम मंदिराचे अध्यक्ष अनिल ब-हाटे यांनी एकमेकांना सणांच्या शुभेच्छा देत शांततेचा व एकसंघपणाचा दाखला दिला.यावेळी प्रा संजय मोरे, प्रल्हाद बोंडे,दिलशाद शेख,सुनील कोंडे आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सपोनि गणेश धुमाळ यांनी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीचे कौतुक करीत सर्वधर्मसमभाव या भावनेने काम केल्याने परिसरात शांतता असल्याने समाधान व्यक्त केले.