मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. परंतु शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे ४० आमदार व १२ खासदार शिंदे गटात गेले आहे. त्यामुळे शिवसेनेवर संकट आलेले असताना २७ जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मला भेट द्यायचीच असेल तर सदस्य नोंदणीच्या अर्जांचे गठ्ठे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे द्या, असा आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलाय. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासदार अरविंद सावंत यांच्या शिवसेना शाखा क्रमांक २०५ या शाखेचं लोकार्पण केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मला वाढदिवसाला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेत. याचं कारण आता त्यांनी प्रोफेशनल एजन्सी कामाला लावल्या आहेत. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओतला तरी हे माझं शिवसैनिकांचं वैभव त्यांना पुरुन उरेल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला दिलाय. फक्त शिवसेना फोडण्याची त्यांची चाल नाही तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा भगवा फोडण्याची त्यांची चाल आहे. आजपर्यंत अनेकजण आपल्याला विचार होते की तुमचं आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक काय. तर त्यांना सांगायचं की शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते आणि भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतो, अशी घणाघाती टीकाही ठाकरे यांनी भाजपवर केलीय.




















