जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्याच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी कोरोना पासुन बंद असलेली शटल सेवा लवकरच सुरू करा. कोळसा, विजेच्या समस्येने रेल्वे सेवा सुरू करण्याच्या अडचणी आहेत ही वस्तुस्थिती असली तरी सत्ताधारी पक्षाचा खासदार असल्याने जनतेच्या अधिक अपेक्षा असून आपण तातडीने शटल सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत. प्रवाश्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी रेल्वेमंत्री ना. अश्विन वैष्णव यांचेकडे प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे.यावेळी रेल्वेमंत्री ना. अश्विन वैष्णव यांनी लवकरच रेल्वे स्लॉट मध्ये शटल सेवेचा समावेश केला जाईल. असे आश्वासन दिल्याने शटल सेवा लवकरच सुरू होवून प्रवाश्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. अशी माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली आहे.
नुकतीच नवी दिल्ली येथे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री ना. अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन भुसावळ देवळाली शटल सेवा पूर्ववत सूरु करावी, “नविन नंदुरबार पुणे एक्सप्रेस”, सुरत भुसावळ पॅसेंजर नियमित करावी, नगरदेवळा,म्हसावद येथे नव्याने थांबा मंजूर करून हुतात्मा एक्सप्रेस सुरू करावी, पाचोरा जामनेर पिजे गाडीसाठी “पंचवीस कोटी”रुपयांचा नूतनीकरण निधी लवकरात लवकर द्यावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन दिल्ली येथे दिले.
शटल सेवा लवकरच होणार सूरु देवळाली भुसावळ शटल गाडीने दररोज हजारो चाकरमानी अधिकारी-कर्मचारी नियमित अपडाऊन करतात. चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ ते थेट नाशिक पर्यंत अप डाऊन साठी सर्वात लोकप्रिय गाडी म्हणून शटल गाडी प्रवाश्यांना सेवा देत होती. मात्र ही गाडी कोरोनापासून बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये मोठा रोष असून आपण या प्रवाशांच्या भावनेचा आदर करीत तातडीने आदेशित करून शटल सेवा तात्काळ सुरू करावी. अशी विनंती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री ना.अश्विन वैष्णव यांना दिलेल्या निवेदनात प्रत्यक्ष भेटून सांगितले आहे.
पि.जे. नूतनीकरणासाठी २५ कोटींचा निधी द्या
शतकी परंपरा असलेल्या पाचोरा जामनेर रेल्वेगाडीने या दोन तालुक्यांच्या प्रवाशी दळणवळणात मोठी भूमिका बजावली होती. मात्र रेल्वेने घाईघाईने या रेल्वे मार्गावरची वाहतूक बंद केली. येत्या काळात 25 कोटी रुपयांचा निधी दिल्यास या मार्गाचे नूतनीकरण होऊन हा मार्ग भविष्यात अजिंठा लेणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याकरिता तातडीने 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर करावा. हा विषय गांभीर्याने मार्गी लावा. अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी ना. अश्विन वैष्णव यांचेकडे केली.
सुरत भुसावळ पॅसेंजर गाडी नियमित करा
जळगाव येथून सुरत येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून ही गाडी सद्यस्थितीत सप्ताहातून दोनच दिवस धावत आहे. या गाडीला पूर्वीच्या वेळापत्रकानुसार नियमित सूरु ठेवावी. अशी मागणी देखील खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
नविन नंदुरबार पुणे एक्सप्रेस सूरू करावी
पुणे येथे जाणाऱ्या विद्यार्थी, पालकांची मोठी प्रवाशी संख्या आहे. त्यामुळे नंदुरबार येथुन अमळनेर, धरणगाव जळगाव मार्गे नविन नंदुरबार पुणे एक्सप्रेस सूरू करावी”जेणेकरून नंदुरबार येथुन अमळनेर, धरणगाव जळगाव पाचोरा आणि चाळीसगाव येथुन जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल. या गाडीच्या प्रस्तावावर रेल्वे मंत्री ना. अश्विन वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने या नव्या गाडीची प्रतीक्षा लवकरच संपेल.अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.