
जामनेर : प्रतिनिधी
पंचायत समिती जामनेर चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यात परस्पर काही शिक्षकांच्या ऑफलाईन पध्दतीने बदल्या करण्यात आल्याचे व ऑक्सिजन किट कामी प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक यांच्याकडून तीन वर्षांपूर्वीच लाखो रुपये जमा केलेची धक्कादायक माहिती तालुक्यातील चर्चेचा विषय बनली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी संबंधित अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून बडतर्फ करणेबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
सरोदे यांच्याकडे जामनेर पंचायत समितीचा गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी पदभार असतांना तसेच त्यांना परस्पर बदल्यांचा अधिकार नसतांना तथा प्रतिनियुक्तीचे अधिकार नसतांना व मा आयुक्त यांना असलेल्या अधिकारांचा परस्पर वापर करून जामनेर तालुक्यातील १)शहापूर कॉर्नर जामनेर शाळेतून ओझर खुर्द शाळेत बदली करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. २) ओझर खुर्द शाळेतील उपशिक्षक यांची कासली शाळेत बदली करण्यात आल्याचे दिसून आले. ३) जळाद्री खुर्द शाळेतील उपशिक्षिका यांची टाकरखेडा शाळेत बदली करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून तसेच ४) ढालगाव उर्दू शाळेतील उपशिक्षिका यांची खाजानगर ,पहुर उर्दू शाळेत परस्पर बदल्या केलेल्या आहेत असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
तरी संबंधित तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करून बदल्या केलेल्या असल्याने यात मोठी आर्थिक देवाण घेवाण झाल्याची ही शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील बदल्या ह्या प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने होत असतांना देखील आपल्या सोयीनुसार जवळच्या शिक्षकांना वशील्याने ग स सोसायटीच्या च्या निवडणूक पार्श्वभूमीवर ऑफलाईन पध्दतीने बदली करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे ही मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची प्रमुख मागणी आहे. तसेच कोरोनाच्या काळात “ऑक्सिजन किट” च्या नावाखाली 3 वर्षांपूर्वी च प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांच्या कडून लाखो रुपये सुद्धा गोळा केल्याची तालुक्यात चर्चा आहे.
संबंधित प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी सरोदे यांची जिल्हा परिषदेच्या उच्चस्तरावरून यांची योग्य ती चौकशी करून तात्काळ दोषी आढळून आल्यास बडतर्फ करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामनेर आपल्या स्टाईलने पुढील काही दिवसात जिल्हा परिषदेच्या दालनात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदनात दिला आहे.




















