जळगाव मिरर / १८ नोव्हेंबर २०२२
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाल्यानंतर आज शेगाव येथील भारत जोडोच्या सभेत राहुल गांधी काय बोलतील यावर राज्याचे लक्ष होते, पण राहुल गांधी या सभेत भाष्य करणे टाळल्याचं पाहायला मिळालं.
राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. राहुल म्हणाले की, ज्यांनी हिंसा सहन केली, ते कधीही हिंसा करू शकत नाही. तिरस्कारही करू शकत नाही. आपण जनतेच्या मन की बात करण्यासाठी आलो, असं म्हणत राहुल यांनी मोदींना टोला लागला. यावेळी राहुल यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले आमचं सरकार असताना विदर्भातील शेतकरी अडचणीत आले होते. त्यावेळी आम्ही तातडीने पॅकेज दिलं. मात्र आता शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरून देखील नुकसान झाल्यावर भरपाई मिळत नाही.
विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचा आवाज ऐकला तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या बंद होतील. त्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करून शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला हवा, असंही राहुल यांनी म्हटलं.