
साज-श्रृंगार परिपूर्ण होण्यासाठी कपाळावर टिकली ही हवीच. आपण साडी घातली की छानशी चंद्रकोर किंवा लाल, तपकिरी रंगाची टिकली लावतो. पण हे झालं नेहमीचंच. त्यात काही हटके करावं वाटत असेल तर मदतीला मॅचिंग टिकलीचा ट्रेण्ड आहेच. सध्या साडीच्या रंगाला मॅचिंग रंगाची टिकली लावण्याचा ट्रेण्ड खूप लोकप्रिय झाला आहे. या ट्रेण्डचं श्रेयही आपल्या रेट्रो काळातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजेच आशा पारेख, मुमताज, राखी, वहिदा रहमान यांना आणि त्यांच्या फॅशन स्टायलिस्टलाच जातं. कारण रेट्रो काळात म्हणजेच ७० आणि ८० च्या दशकात या सगळ्याच अभिनेत्री रुपेरी पडद्यावर साडीच्या रंगाची टिकली लावलेल्या दिसतात. तोच ट्रेण्ड सध्या खूप हिट झालाय.

बॉलिवूड दिवा म्हणून ओळखल्या जाणा-या विद्या बालन, कंगना राणावत, प्रियांका चोप्रा, करिना कपूर यांनी या मॅचिंग टिकलीला पसंती दिलीय. मॅचिंग रंगाच्या टिकलीत गडद निळा, गडद गुलाबी, हिरवा या रंगाची टिकली तर पारंपरिक सौंदर्याला आणखीनच खुलवते. या गडद रंगांबरोबरच फिकट रंगाच्या शेड्समधील आॅफ व्हाइट, आकाशी, गुलाबी या रंगांच्या टिकल्याही तितक्याच खुलून दिसतात. मॅचिंग रंगाची टिकली ही शक्यतो गोलाकारातलीच लावली जाते. तरच ती शोभून दिसते.
ट्रेण्ड मोठ्या आकाराच्या टिकलीचाही मॅचिंग रंगाच्या टिकलीप्रमाणेच मोठ्या आकाराची टिकली हादेखील ट्रडिशनल लूकसाठीचा फंडा ठरला आहे. दिपिका पदुकोणनं ‘पिकू’ चित्रपटात अशी टिकली लावली होती. तिचा हा लूक टिकलीमुळे खूपच उठून दिसला. आणि लोकप्रियही झाला होता. त्यानंतर साडीसारख्या पोशाखावर मोठ्या आकाराची टिकली लावण्याचा ट्रेण्ड प्रचलित झालाय. एरव्ही मोठी टिकली म्हणजे काकूबाई लूक म्हणून नाकं मुरडणा-याही आता मोठी टिकली लावताना दिसतात कारण फॅशनच मोठ्या टिकलीची आहे ना!






















