जळगाव मिरर | २० जानेवारी २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना छत्रपती संभाजी नगर शहराजवळील वाल्मी नाका परिसरात सोलापूर-धुळे हायवे उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ब्रेक फेल होऊन अचानक रस्त्यावर येऊन थांबलेल्या ट्रकला १२ वाहने धडकल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मनीषा शिंगणापुरे (३५, रा. चितेगाव, मूळ गाव येरमाळा, जि. बीड) असे मृत महिलेचे नाव आहे. इतर जखमींना घाटी व खासगी दवाखान्यात दाखल केले आहे.
सळयांनी भरलेला ट्रक बीडहून येत हाेता. अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाने हायवेवरून बायपास घेत वाल्मी नाक्याजवळील पैठण रोडवर ट्रक उतरवला. यामुळे १२ वाहने एकमेकांना धडकली. एका महिलेच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने ती जागीच ठार झाली, तर ८ ते १० जण जखमी झाले. अपघातामुळे नक्षत्रवाडी ते गेवराई तांडापर्यंत वाहतूक खोळंबली होती. नागरिकांनी मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. ट्रकचे नियंत्रण सुटले की ब्रेक फेल झाले याबाबत तपास सुरू आहे.
यात शेख इरफान शेख मोहंमद नूर (४५, रा. उस्मानपुरा), शेख नदीम शेख इस्माईल (४५, रा. उस्मानपुरा), अब्दुल बासीत अब्दुल मन्नान (२५, रा. वडगाव खुर्द), शेख सुलेमान शेख मेहबूब (रा. वडगाव), शफीश शेख शेख हुसेन (३०, रा. बायजीपुरा), रहीम खान (५६, रा. संजयनगर, बायजीपुरा) यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर मृत मनीषा शिंगणापुरे या मूळ बीडच्या असून त्या कंपनीत कामासाठी चितेगाव येथे राहत होत्या. शहरात त्या कामानिमित्त मैत्रिणीसोबत आल्या होत्या.वाल्मी नाका भागात ब्रेक फेल झालेल्या ट्रकवर १२ छोटी-मोठी वाहने धडकल्याने मार्गच बंद झाला.