
जळगाव मिरर | ४ जुलै २०२३
राज्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची वार्ता थांबत नाही तोच खान्देशातील धुळे जिल्ह्यात भीषण अपघातात १३ जण ठार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील मुंबई – आग्रा महामार्गावर भरधाव वेगातील एक कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने जवळपास 13 जण ठार झाल्याची भयावह घटना घडली आहे. या अपघातात जवळपास 20 जण जखमी झालेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. धुळ्यातील मुंबई – आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ मंगळवारी सकाळी 10.30 वा. हा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव वेगातील एक कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरला. त्यात 13 जणांचा चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
यासंबंधीच्या माहितीनुसार, महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या जवळ असलेल्या भागात मोठा उतार आहे. या उतारावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते. त्यानंतर हा कंटेनर थेट पळासनेर गावाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. या कंटेनरने अन्य काही काही वाहनांनाही धडक दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गाडीतील काही जणांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.





















