जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२५
देशातील छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार आहेत. अद्याप चकमक सुरु आहे, असे वृत्त ANIने दिले आहे. दरम्यान, १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला एक नक्षलवादीही या चकमकीत ठार झाल्याचे छत्तीसगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे. छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जवानांनी १४ नक्षलवाद्यांना ठार केले. मोठा शस्त्र साठाही जप्त करण्यात आले आहे. कुल्हाडी घाटावरील भालू डिग्गी जंगलात चकमक सुरुच आहे. सुरक्षा दलांचे सुमारे एक हजार जवानांनी या मोहिमेत सहभागी आहेत.
ओडिशा-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलींची चकमक झाली. संयुक्त आंतरराज्यीय कारवाई रात्री उशिरापासून सुरु हाेती,” असे ओडिशा पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेपासून फक्त ५ किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील कुलारीघाट राखीव जंगलात संयुक्त कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या १४ झाली आहे. “माओवाद्यांच्या मृतांची संख्या वाढू शकते. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे,” असेही पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
मृत १४ नक्षलींमध्ये सोमवारी ठार झालेल्या दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. या चकमकीत १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादीही ठार झाला आहे, अशी माहिती छत्तीसगड पोलिसांनी दिली. तसेच कोब्रा युनिटचा एका जवान जखमी झाला आहे. ओडिशाचे पोलीस महासंचालक योगेश बहादूर खुरानिया यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले की, “गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे, ओडिशा पोलिस, छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त ऑपरेशन सोमवारी (२० जानेवारी) रात्री नवापारा आणि छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याच्या सीमेवर शोध मोहिम राबवली. ही कारवाई ओडिशा आमच्या सीमेपासून सुमारे ५ किमी अंतरावर गरियाबंद येथे करण्यात आली. पहाटेच्या सुमारास नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा, आयईडी जप्त करण्यात आले आहेत. परिसरात अजूनही शोध मोहिम सुरु आहे.”