
जळगाव मिरर / २१ नोव्हेंबर २०२२
एरंडोल शहरातील रेणुका नगरातील रहिवासी असलेले वासुदेव पाटील यांच्या १६ वर्षीय मुलगा साई उर्फ यश पाटील हा २१ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातील बाथरूममध्ये अंघोळ करताना गिझरमधून गॅसची गळती झाल्याने त्यात गुदमरून साईचा मृत्यू झाला. या घटनेने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
एरंडोल शहरातील रा.ती. कावरे विद्यालयाचा विद्यार्थी यश पाटील हा सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेला मात्र बराच वेळ झाल्यामुळे तो बाथरूममधून बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला असता तो बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. यावेळी आई-वडिलांनी एकच हंबर्डा फोडला. हे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले असता नागरीकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान, मयत यश हा रेणुका नगरातील रहिवासी व काबरे विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक व्ही.टी.पाटील यांचा मुलगा तर शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पुंडलिक पाटील यांचा पुतण्या होय.




















