जळगाव मिरर | २९ मार्च २०२५
सलग 5 व्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील सर्व 288 विधानसभेत शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात व शिवसेना तथा युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेदरम्यान करण्यात आले होते.
युवासेना आयोजित महासराव परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातील 24315 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती, यात जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक 3128 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अनुषंगाने जळगाव शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी युवासेना – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शनिवार दि. 29 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.00 वाजेदरम्यान जिल्ह्यातील 11 केंद्रावर अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या 2126 विद्यार्थ्यांनी मोफत सीईटी सराव परीक्षा दिली.
यामध्ये जळगाव शहरातील महावीर क्लासेस येथे 284, जी.एच.रायसोनी महाविद्यालय येथे 184 तसेच धनाजी नाना चौधरी महाविद्यालय येथे 64 विद्यार्थ्यांनी असे एकूण 532 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, फार्मसी विभागाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट महासराव परीक्षा संपन्न झाली. परीक्षेच्या यशश्वीतेसाठी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, चंद्रकांत शर्मा, युवासेना कॉलेज कक्षचे प्रीतम शिंदे, अजय खैरनार, प्रा.शिवराज पाटील, अक्षय गादिया, हर्षल ठाकूर, गुंजन चौधरी यांनी परिश्रम घेतले.