जळगाव मिरर | १ जुलै २०२५
चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक बायपासवर दुचाकी व आयशर ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० जूनला पहाटे घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करुन दुवामहल यासिनीनगर समोरील महामार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी केली.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील बायपासवर ३० जूनला पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास शेतासाठी खत घेऊन दुचाकीवर निघालेल्या आबा जानराव (धनगर, वय ३५) यांचा आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले भगवान कोल्हे (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर संतप्त खडकी ग्रामस्थांनी रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे मार्गावरील दोन्हीकडील वाहने खोळंबली होती. दरम्यान, चाळीसगाव शहर पोलिस व वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावत गेले अन् त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. तर, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याच जागेवर काही दिवसांपूर्वी एका वृद्ध व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता. तर येथे आतापर्यंत जवळपास ८ अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या रस्त्यावर वेगमर्यादा, वाहतूक नियमन व सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. तत्काळ खडकी बुद्रुक परिसरातील सब स्टेशन, दुवा महलसमोर ही स्पीड ब्रेकर तयार करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
