
जळगाव मिरर | ८ मार्च २०२६
राज्यातील भिवंडी तालुक्यातील बापगाव येथून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शेजारच्या महिलेला प्रेमाने ‘मम्मा’ अशी हाक मारल्यामुळे संतापलेल्या एका महिलेने आपल्या तीन वर्षीय दत्तक मुलीच्या डोळ्यात व तोंडात मिरची पूड टाकून अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिले सह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरालगत असलेल्या बापगाव येथे राहणाऱ्या दिलशान शेख या महिलेने काही महिन्यांपूर्वी एका तीन वर्षीय मुलीला दत्तक घेतले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या चिमुरडीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला प्रेमाने ‘मम्मा’ अशी हाक मारली. ही बाब दिलशान शेख हिला सहन झाली नाही. या किरकोळ कारणावरून संतापलेल्या दिलशान शेख हिने त्या चिमुरडीला घरात कोंडून ठेवले. त्यानंतर तिच्या डोळ्यात आणि तोंडात तिखट मिरची पूड टाकत तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे चिमुरडी गंभीर जखमी झाली असून ती अक्षरशः अर्धमेली अवस्थेत आढळून आली.
दरम्यान, या अमानुष घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये दिलशान शेख ही आपल्या दत्तक मुलीला मारहाण करताना दिसत आहे. यावेळी तिचा पती शौकत शमशुद्दीन शेख हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र त्याला बाजूला सारत ती चिमुरडीला मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसून येते. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पीडित मुलीची आरोपी महिलेच्या ताब्यातून सुटका केली. त्यानंतर मुलीला पुढील सुरक्षितता व उपचारांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे.
तसेच व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी दिलशान शेख हिच्यासह तिचा पती शौकत शमशुद्दीन शेख आणि मुलीला दत्तक देणारा उमेश येवले यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित मुलीचे वडील उमेश येवले यांनी मुलीला कोणत्या परिस्थितीत दत्तक दिले तसेच दत्तक प्रक्रियेदरम्यान कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली होती का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून निरागस चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे समाजमन हादरले आहे.




















