जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२५
शहरातील प्रेमनगर येथील बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सीबीएसई पॅटर्न) यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन मंगळवार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात करण्यात आले आहे.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांकडून विविध हिंदी, मराठी व इंग्रजी गीतांवर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यात येणार असून एकूण ३६० हून अधिक विद्यार्थ्यांनी समूह नृत्यांमध्ये सहभाग नोंदविला आहे. तब्बल ३१ विविध गीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून केले जाणार आहे.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून रोबोटिक्सच्या माध्यमातून वैज्ञानिक प्रयोग सादर करण्यात येणार असून वृद्धाश्रमावर आधारित सामाजिक संदेश देणारी नाटिका देखील सादर केली जाणार आहे.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शाळेचे चेअरमन, संचालक तसेच पालक-शिक्षक संघाच्या प्रतिनिधींच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमादरम्यान शाळेच्या वतीने वर्षभरात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती शाळेचे प्राचार्य मनोज शिरोळे हे विद्यार्थी व पालकांना देणार आहेत.
यावेळी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार असून, शाळेबाहेर विविध स्पर्धांमध्ये पदके व ट्रॉफी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ग्लिटरिंग ट्रॉफी’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना विशेष ट्रॉफी, तर होमीभाभा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘इमर्जिंग सायंटिस्ट ट्रॉफी’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.




















