
जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२४
नशिराबाद टोल नाक्याजवळ नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाने मंगळवारी रात्री १२.२० वाजता धडक कारवाई करत गुटखा, तंबाखू, सुगंधित पानमसाला असा २८ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुसऱ्या घटनेत शुक्रवारी तालुका पोलिसांनी शहराजवळील एकवीरा हॉटेल समोरील रस्त्यालगत गुटखा, तंबाखूची वाहतूक करणारा ट्रक जप्त करून १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही कारवायांत एकूण ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दोन्ही घटनांप्रकरणी मंगळवारी नशिराबाद पोलिस स्टेशन व जळगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यात विक्री करण्यासाठी ट्रक (एच.आर. ३८, टी ५४१०) मधून बेकायदेशीररीत्या तंबाखू, गुटखा व सुगंधित पानमसाला यांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री १२.३० वाजता नशिराबाद टोल नाक्याजवळ धडक कारवाई करत ट्रक पकडला.
यावेळी पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चाळीसगाव तालुक्यात विक्री करण्यासाठी घेऊन जाणारा गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखू आढळून आली. दरम्यान, पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात संशयित आरोपी अखिल खान सुलतान खान (वय ४८, रा. खंडवा, मध्यप्रदेश), फिरोज खान छोटू खान (वय ३६, रा. इंदुर, मध्य प्रदेश), संजय (रा. सेंधवा, मध्य प्रदेश) आणि करडा (रा. चाळीसगाव) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण २८ लाख ६८ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.