जळगाव मिरर | ६ सप्टेंबर २०२५
यावल शहरातील बाबूजी पुरा भागात शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) सायंकाळपासून बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय बालकाचा मृतदेह शनिवारी (दि. ६) सकाळी शेजारील घरात एका कोठीत आढळून आला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मृत बालकाचे नाव मो. हन्नान खान मजीद खान (वय ६) असे असून, तो मजीद खान जनाब यांचा मुलगा आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बालक बेपत्ता होता. नातेवाईक व नागरिकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शेजारीच राहणारे बिस्मिल्ला खलीफा दस्तगीर खलीफा यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील कोठीत आढळून आला. ही माहिती मिळताच परिसरात मोठा जमाव जमा झाला. सदर दुकान बारी चौकाच्या अलीकडे मुख्य रस्त्यालगत आहे. या घटनेनंतर शहरातील इतर दुकानदारांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपापली दुकाने बंद केली. घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे. फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी बाबूजी पुरा भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
घटनास्थळी डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हाजी शब्बीर खान, शरद कोळी, सहायक पोलीस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, पो.उ.नि. एम.जे. शेख आणि अयाज खान, तसेच समाजातील इतर मान्यवरांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव दीर्घकाळ आक्रमक राहिला. सध्या शहरात तणावाचे वातावरण असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. पोलिसांकडून घटनेचा सर्व अंगांनी तपास सुरू आहे.