जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२५
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे दिल्ली–आग्रा (यमुना) एक्सप्रेसवेवर मंगळवारी पहाटे सुमारे ४ वाजता दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला. बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात बस एकामागोमाग आदळल्या. धडकेनंतर काही बसना आग लागल्याने परिसरात घबराट पसरली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कमी दृश्यमानतेमुळे एका बसचा वेग अचानक कमी झाला आणि मागून येणाऱ्या बसांनी एकामागोमाग धडक दिली. अपघातानंतर काही बसमध्ये आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, टक्कर झाली तेव्हा अनेक प्रवासी बसमध्ये झोपले होते. अचानक आग लागल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर पडण्यासाठी धावपळ केली.
अपघातात सहभागी असलेल्या सात बसपैकी काही उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या (रोडवेज) तर काही खासगी स्पीकर बस असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मथुराचे एसएसपी श्लोक कुमार यांनी सांगितले की, दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात घडला. या साखळी अपघातात सात बस आणि तीन लहान वाहनांची धडक झाली असून आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातानंतर काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.




















