जळगाव मिरर | १३ जुलै २०२४
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील नववीचा विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन हा शाळेत शेवटच्या तासाला सायंकाळी साडेचारच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन (वय १५) हा नववीत शिकत होता. हा विद्यार्थी संध्याकाळी शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक चक्कर येऊन तो पडला. त्यावेळेस शिक्षकांनी तत्काळ त्याला सावरले. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी तपासणी करुन त्याच्यावर प्रथमोपचार केले. तसेच त्याला त्वरीत अमळनेर येथील डॉ. निखिल बहुगुणे यांच्या रुग्णालयात भरती केले. त्यांनी तपासणी करुन घनश्याम महाजन याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, घनश्याम हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडील शेतकरी असल्याने तो शाळेबरोबरच त्यांना शेतातही मदत करत असे. अत्यंत नम्र व हुशार असलेला हा गुणी विद्यार्थी क्रीडा, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम अशा सर्व कार्यक्रमात सहभाग घ्यायचा, शिक्षकांचा अत्यंत आवडता असलेला घश्यामच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या वेळी संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या पश्चात आई-वडील, आजी, आजोबा, काका व २ बहिणी असा परिवार आहे, अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.