औरंगाबाद : वृत्तसंस्था
शहरात पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शहरात पुन्हा एकदा तलवारी मागविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. क्रांती चौक पोलिसांनी निराला बाजार येथील डीटीडीसी कुरियर कार्यालयावर छापा टाकला. या छाप्यामध्ये एक पार्सल बॉक्स सापडले. त्यानंतर या बॉक्सची चाचपणी केली असता या पार्सल बॉक्समध्ये 37 तलवारी आणि एक कुकरी जप्त करण्यात आली. औरंगाबाद शहरात कुरियरने तलवारी मागविण्याची ही तिसरी घटना आहे.
औरंगाबाद आणि जालना या दोन शहरांमधून 7 ग्राहकांचे पत्ते या पार्सलवर आढळून आले आहेत. यामध्ये पाच औरंगाबादचे ग्राहक असून दोन जालन्याचे ग्राहक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, कुरियरने शहरात तलवारी आल्याची माहिती मिळाली. यावरून क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने निराला बाजारा येथील डीटीडीसी कुरियरच्या कार्यालयावर छापा टाकला. परंतु व्यवस्थापक जोगदंड यांना याबाबत माहिती विचारली असता, असे कोणतेही प्रकारचे पार्सल आले नसल्याची माहिती त्यांनी सांगितली.