जळगाव मिरर । २२ नोव्हेबर २०२२
नाशिक शहरातील महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने महाविद्यालयासह वसतिगृह परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे अल्पवयीन तरुणांच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे नागरिकांसह पालकवर्गात भीतीचे सावट पसरले आहे.
गौरव रमेश बोरसे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातीलच सटाणा परिसरात असलेल्या डांगसौंदाने येथील रहिवासी आहे. गौरव हा नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. शिवाय महाविद्यालयाच्याच हॉस्टेलमध्ये राहत होता. मात्र टी वाय बी कॉममध्ये शिकणाऱ्या गौरवने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे. वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या गौरवने अचानक जीवन संपविल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय गौरव आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न आता महाविद्यालय प्रशासनासह विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना पडला आहे. गौरवने आत्महत्या का केली त्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव बोरसे हा वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. त्यामुळे येथीलच वसतिगृहामध्ये त्याने प्रवेश घेतला होता. महाविद्यालयाच्या तासिका संपल्यानंतर फावल्या वेळेत तो आपल्या मामाकडे काम करायचा. मात्र आज सकाळच्या सुमारास अघटित घडलं. गौरवच्या राहत असलेल्या वसतिगृहातील शेजारील रूममध्ये राहणारा एक मुलगा इस्त्री मागण्यासाठी गौरवकडे गेला. मात्र त्याला समोरील चित्र पाहिल्यानंतर पायाखालची वाळू सरकली. त्याला विश्वासच बसेना. वसतिगृहात ही बाब पसरल्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे. गौरव बोरसेने टोकाचे पाऊल उचलून जीवन यात्रा संपविल्याने बोरसे कुटुंबीयावर दु: खाचा डोंगर कोसळला असून महाविद्यालय आणि हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांकडून देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.