जळगाव मिरर । २३ नोव्हेबर २०२२
प्रयागराजहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेस मधुन पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान उत्तर प्रदेश येथील एका २५ वर्षीय युवकाचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, गुलशन कुमार (२५) रा. मु. शारदा प्रसाद, नुरपुर कासापुर, पो. छीतपालगढ हा आपल्या १३ वर्षीय भावासह मुंबई फिरण्यासाठी पाटलीपुत्र एक्सप्रेस मधून प्रवास करत होता. दरम्यान पाटलीपुत्र एक्सप्रेसने पाचोरा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावरच गुलशन कुमार याचा पाय घसरला आणि खाली पडला. सदरचा प्रकार त्याच्या भावाने बघताच प्रवाशांच्या मदतीने आपात्कालीन चैन ओढण्यात आली. रेल्वे चैन ओढल्याने थांबल्यानंतर मयताचा भाऊ एक्सप्रेस मधुन उतरुन घटनास्थळी धावत गेला. गुलशन कुमार हा अप लाईनच्या रेल्वे रुळानजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७०/२०/२२ दरम्यान मृत अवस्थेत आढळुन आला. भावाचा मृतदेह पाहून चिमुकल्याने एकच आक्रोश केला.
या घटनेची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनला कळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मयत गुलशन कुमार याचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील, किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.