जळगाव मिरर / २७ नोव्हेंबर २०२२
मनसेच्या गटप्रमुखांचा मुंबईमध्ये मेळावा सुरु आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला. यावेळी राज ठाकरे हे शिंदेसह ठाकरे गटावर हि चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
राज ठाकरे म्हणाले की, आजपर्यंत महाराष्ट्रात जेवढी आंदोलनं झाली त्या सर्वांपेक्षा आपल्या आंदोलनांना जास्त यश आलेलं आहे. ही आपली आंदोलनं लोकांच्या विस्मरणात कशा जातील, यासाठी काही यंत्रणा काम करत होत्या. परंतु आपल्या आंदोलनानंतर ६५ ते ७० टोलनाके बंद झाले. परंतु ज्यांना टोल बंद करु अशी आश्वासनं देणाऱ्यांना पत्रकार प्रश्न विचारत नाहीत. मात्र प्रश्न कायम आम्हाला विचारले जात आहेत. सोळा वर्षांमध्ये मनसेने कोणकोणती आंदोलनं केली आणि ती कशी पूर्ण केली यासाठी पुस्तिका प्रकाशित करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
‘गुजरातमध्ये एक अत्याचाराची घटना घडल्यानंतर तेथील अल्पेश ठाकूर या आमदाराने परप्रांतियांना बेदम मारुन हाकलून दिलं होतं. त्यानंतर गुजरातमधून २० हजार उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांना हाकलून दिलं. २०१९ला त्याच अल्पेश ठाकूरला पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली. हे दिसत नाही का?”बाळासाहेबांची इच्छा होती. मशिदीवरील भोंगे निघाले पाहिजेत. आपण काढायला नाही सांगितलं. फक्त हनुमान चालिसा लावू म्हणालोत आणि भोंगे उतरले. अजूनही काही ठिकाणी चर्बी उतरलेली नाही. जिथे जिथे भोंगे चालू असतील तिथे पोलिसांकडे तक्रार करा. पोलिसांनी ऐकलं नाही तर तिथे कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस होऊ शकते. न्यायालयाचा अपमान केल्याची केस होऊ शकते. पोलिसांकडून काही झालं नाही तर मोठ्या ट्रकवर मोठे स्पिकर लावून हनुमान चालिसा लावा. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही. जोपर्यंत आरे ला कारे होत नाही तोपर्यंत असंच होणार.