जळगाव मिरर / २९ नोव्हेंबर २०२२
दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणात तपासागणिक नवंनवीन गोष्टी समोर येत आहेत. आफताबसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी श्रद्धा वालकर त्याच्यासोबत ब्रेकअप करणारी होती. मात्र, तिच्या या निर्णयाने संतापलेल्या आफताबने तिची हत्या केली असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले. श्रद्धा हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. आफताब पूनावालाला तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या आफताब आणि श्रद्धामध्ये लहान गोष्टींवरून वाद होत असे. आफताबचे वागणं आणि त्याच्याकडून होणारी मारहाण याला श्रद्धा कंटाळली होती. त्यामुळे तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. श्रद्धाने 3-4 मे रोजी आफताबपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय आफताबला पटला नाही. त्यामुळे तो प्रचंड संतापला होता. दिल्ली पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात अनेक पुरावे मिळाले आहेत. पोलिसांना मेहरौली आणि गुरुग्राम सीमेवरील जंगलातून 13 मानवी हाडे सापडली असून ती तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत. श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी त्याची तपासणी सुरू आहे. आफताबच्या फ्लॅटमधील किचनमध्ये पोलिसांना रक्ताचे डाग दिसून आले आहेत. त्याशिवाय, 5 ते 6 इंच आकाराचे चाकूदेखील मिळाले आहेत. मात्र, हत्येसाठी वापरण्यात आलेले करवत पोलिसांना हस्तगत करता आले नाही. आफताबच्या फ्लॅटमधून काही कपडे जप्त केले आहेत. त्याशिवाय, पोलिसांनी पेटीएम, बम्बल डेटिंग अॅप, झोमॅटो आणि ब्लिंकिट सारख्या प्लॅटफॉर्मकडून माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे.